Home Breaking News पुणेकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; प्रशासनाकडून ‘ड्राय डे’ लागू

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; प्रशासनाकडून ‘ड्राय डे’ लागू

43
0
पुणे : पुणेकरांच्या लाडक्या गणेशोत्सवाला यंदा अभूतपूर्व गर्दीची अपेक्षा असून, तो सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक नियोजन आखले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा शहरभरात ७००० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून कडक बंदोबस्त उभारण्यात आला आहे. यात १० पोलिस उपायुक्त, २७ सहाय्यक पोलिस आयुक्त, १५४ पोलिस निरीक्षक, ६१८ उपनिरीक्षक आणि तब्बल ६२८६ अंमलदार यांचा समावेश आहे. याशिवाय, १६ स्ट्रायकर पथके, १४ क्यूआरटी हिट पथके, ७ बीडीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) पथके आणि ११०० होमगार्ड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. एक एसआरपीएफ कंपनीही तैनात राहणार आहे.
पुण्यातील ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असून, चेंगराचेंगरी टाळण्यासाठी महत्त्वाच्या चौकांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, गर्दी नियंत्रण आणि गुन्हे रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांवर एआय (Artificial Intelligence) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे संशयास्पद हालचालींवर थेट नजर ठेवणार आहेत.
सुरक्षेच्या तयारीचा भाग म्हणून पोलिसांनी ८२ बैठकांचे आयोजन केले आहे. गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अँटी चेन स्नॅचिंग पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पोलिसांनी भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
ध्वनिक्षेपक वापरासंदर्भात नियम लागू करण्यात आले असून, ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी असेल. तसेच, शिस्त राखण्यासाठी आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २७ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पुणे शहरात ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे.
या सर्व नियोजनामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांना सुरक्षित वातावरणात बाप्पाचे दर्शन घेता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ७००० हून अधिक पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्यांद्वारे चौकशी, २७ ऑगस्ट व ६ सप्टेंबर ‘ड्राय डे’