Home Breaking News पुण्यात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; पोलिसांचा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त, सहाय्यक फौजदार...

पुण्यात जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; पोलिसांचा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त, सहाय्यक फौजदार निलंबित

62
0
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नारायण पेठेतील ‘क्रीडामहर्षी हरिभाऊ साने’ PMC वाहनतळावर पत्त्याच्या जुगाराचा अड्डा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक छापा टाकत ४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदारास निलंबित करण्यात आले आहे.
या धडक कारवाईने महापालिकेच्या मालकीच्या वाहनतळाचा गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, जुगार खेळणाऱ्यांमध्ये शहरातील विविध पेठा व उपनगरांतील काही प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने केली.
जप्त मुद्देमालामध्ये एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड, २५ मोबाईल फोन, आणि पत्त्यांचे कॅट यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, हा जुगाराचा अड्डा PMC च्या वाहनतळात थेट सुरु होता आणि खासगी ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे यास खतपाणी मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, गुरुवार पेठ, सहकारनगर, कात्रज, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, पाषाण, मांजरी, सिंहगड रोड, नन्हे आणि कोंढवा येथून आलेल्या काही व्यक्तींनी या अड्ड्यात सहभाग घेतल्याचे उघड झाले आहे.
ही घटना समोर आल्यानंतर PMC प्रशासनाच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहनतळ चालवणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 या कारवाईनंतर शहरातील इतर वाहनतळ आणि सार्वजनिक जागांमध्ये सुरू असलेल्या अशाच अड्ड्यांची चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 हायलाइट्स :
४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
जुगार खेळणाऱ्यांमध्ये काही व्यापारीही
PMC वाहनतळात अड्डा; ठेकेदाराचं दुर्लक्ष?
सहाय्यक फौजदार निलंबित
PMC व पोलिस प्रशासनाची चौकशी सुरु