Home Breaking News गोरेगावमध्ये मराठी भाषिक व्यक्तीला दमबाजी व शिवीगाळ; मनसेचा संतप्त मोर्चा, बजाज फायनान्सच्या...

गोरेगावमध्ये मराठी भाषिक व्यक्तीला दमबाजी व शिवीगाळ; मनसेचा संतप्त मोर्चा, बजाज फायनान्सच्या कार्यालयात गोंधळ

10
0
मुंबई : गोरेगाव परिसरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात एका मराठी भाषिक ग्राहकाला धमकी व अपमान केल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. संबंधित व्यक्तीने आपला कर्जहप्ता पूर्णपणे फेडला असतानाही, कर्मचाऱ्यांकडून त्याच्याशी अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विधानसभा अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी कार्यकर्त्यांसह बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक दिली आणि जोरदार निषेध व्यक्त केला.
मनसे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यालयात घोषणाबाजी केली आणि तोडफोड केली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला, ज्यामुळे संताप आणखी वाढला. यामुळे कार्यालयात प्रचंड गोंधळ आणि कामकाज ठप्प झाले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मनसेने जाहीर केले आहे की जोपर्यंत मराठी ग्राहक आणि राज ठाकरे यांच्याबाबत अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही. विरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले की, “हे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण मराठी समाजाचा अपमान आहे. याविरोधात आम्ही तीव्र स्वरूपात लढा देणार आहोत.”
दरम्यान, दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील वाशी परिसरात एका २० वर्षीय विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला करण्यात आला. त्याने केवळ समोरच्या व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगितले, म्हणून त्याला जबर मारहाण करण्यात आली. अ‍ॅरोली येथील पवणे गावचा रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटना दाखवतात की मराठी भाषिक लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता आवाज बुलंद होत आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मनसेने या आंदोलनातून दिला आहे.