Home Breaking News पवना धरण ८३% भरले! आज अकरा वाजता सुरू होणार १४०० क्युसेक्स विसर्ग...

पवना धरण ८३% भरले! आज अकरा वाजता सुरू होणार १४०० क्युसेक्स विसर्ग – नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

15
0
मावळ | २५ जुलै २०२५ – मावळ तालुक्यात विशेषतः पवन मावळ विभागात गेल्या २४ तासांपासून अतिमुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पवना धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असून, धरण सद्यस्थितीत ८३.१६% भरलेले आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता धरणाच्या सांडव्यावरून सुमारे १४०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी दिली.
धरणात मोठा येवा – विसर्ग वाढण्याची शक्यता
पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येवा होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग आवश्यक झाला आहे. सध्या नियोजित विसर्ग १४०० क्युसेक्स असला, तरी पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिली आहे.
नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना
पवना नदी काठच्या नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे.
नदीपात्रात अचानक पाण्याची पातळी वाढू शकते.
मच्छीमार, शेतकरी व नदीकाठी वास्तव्य करणारे नागरिक तात्काळ सुरक्षित स्थळी हलावेत.
अनावश्यकपणे नदीपात्राच्या परिसरात जाऊ नये.
जिल्ह्यात येलो अलर्ट; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा मारा
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील ३ ते ४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
भविष्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी पाहता, पुढील काही तासांत पवना नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाकडून अपील
जिल्हा प्रशासन आणि धरण विभागाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
पावसाचे संकट आणि नियोजनबद्ध प्रतिसाद
या संपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मावळ तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्यास संभाव्य संकट टाळता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.