कोकण २१ जुलै : कोकणातील नागरिकांचे हाल संपण्याचं नाव घेत नाहीत. आजही कोकणातून मुंबईकडे प्रवास करताना अनेक भागांत रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली दिसून येते. लांजा, संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे, तसेच इतर भागांतून प्रवास करणाऱ्यांना पावसामुळे खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि धोकादायक वळणांचा सामना करावा लागत आहे.
शासन, मंत्री, स्थानिक प्रशासन यांच्याकडून वारंवार आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची परिस्थिती तशीच राहिल्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. प्रत्येक पावसाळ्यात हेच चित्र पाहायला मिळते — रस्ते वाहून जातात, खड्डे वाढतात आणि वाहनचालकांचा जीव मुठीत येतो.
कोकणची माणसं साधी, भोळी — पण किती वेळ सहन करणार? कोकणवासीयांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याची भावना आता वाढीस लागली आहे. कोकण हे केवळ पर्यटनस्थळ नसून हजारो लोकांचं रोजचं जीवन इथल्या रस्त्यांवर अवलंबून आहे.
सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कोकणातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून आता सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.