भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आकाराला! BEML कारखान्यात निर्मितीला वेग; ताशी २८० किमी धावणार.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गासाठी B28 ट्रेनची निर्मिती; ५५७ प्रवाशांची क्षमता, आधुनिक तंत्रज्ञान आणि कमी ऊर्जा वापराची खासियत
बेंगळुरू :२ नोव्हेंबर २०२६.
भारताच्या हायस्पीड रेल्वे क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल पडत असून, देशातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. बेंगळुरू येथील BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) कारखान्यात B28 या अत्याधुनिक ट्रेनची निर्मिती केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावण्यासाठी ही ट्रेन तयार करण्यात येत असून, स्वदेशी रेल्वे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या बुलेट ट्रेनची सर्वाधिक चाचणी गती ताशी २८० किलोमीटर, तर नियोजित व्यावसायिक गती ताशी २४९ किलोमीटर असणार आहे. सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये आठ डबे असतील. त्यामध्ये चार मोटर कार आणि चार ट्रेलर कारचा समावेश आहे. भविष्यात दोन आठ डब्यांच्या ट्रेन एकत्र जोडून १६ डब्यांची ट्रेन चालवण्याचीही योजना आहे.
प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून ट्रेनची एकूण क्षमता ५५७ प्रवाशांची ठेवण्यात आली आहे. यामध्ये सात स्टँडर्ड क्लासचे डबे आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लासचा डबा असेल. स्टँडर्ड क्लासमध्ये ३×२, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये २×२ आसनव्यवस्था असेल. दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र आसने, व्हीलचेअर आणि सुलभ प्रवासाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ट्रेनच्या निर्मितीसाठी मजबूत आणि हलक्या वजनाच्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येत आहे. तसेच ऊर्जा बचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पातील पहिली प्रोटोटाइप ट्रेन मार्च २०२७ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आवश्यक चाचण्या आणि प्रक्रिया पूर्ण करून मुंबई-अहमदाबाद मार्गावर ऑगस्ट २०२७ पासून व्यावसायिक सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भारत केवळ बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेनेच नव्हे, तर स्वदेशी हायस्पीड ट्रेन निर्मितीच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण झेप घेण्याच्या तयारीत आहे.