Home Breaking News नवी मुंबईत २२ एकरांवर उभारणार अत्याधुनिक ‘इंडिया ज्वेलरी पार्क’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नवी मुंबईत २२ एकरांवर उभारणार अत्याधुनिक ‘इंडिया ज्वेलरी पार्क’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ!

40
0

 नवी मुंबईत २२ एकरांवर उभारणार अत्याधुनिक ‘इंडिया ज्वेलरी पार्क’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ!

महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनविण्याचा संकल्प; उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नवी मुंबई, दि. २५ ऑक्टोबर २०२६ (पोलखोलनामा न्यूज) : महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. नवी मुंबईतील महापे येथे २२ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ‘इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई’ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. २५) करण्यात आला.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रत्न व आभूषण उद्योगाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळणार असून, उत्पादन, निर्यात, उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल कारागीर, अनुभवी उद्योजक, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि व्यापाराची समृद्ध परंपरा ही राज्याची प्रमुख बलस्थाने आहेत. या सामर्थ्याच्या जोरावर महाराष्ट्राला जागतिक दागिने उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील बदलत्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे दागिने उद्योगाने आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उत्पादन पद्धती आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उद्योगाला या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी सरकारचे सर्वतोपरी सहकार्
उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध शासकीय परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला बळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला गती देतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महापे येथील हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, सरकार आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून महाराष्ट्राची जागतिक व्यापारातील ताकद आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.