Home Breaking News लोणावळ्यात नातवाची गोळी झाडून हत्या; अपघाताचा बनाव करणाऱ्या पाच आरोपींना अटक.

लोणावळ्यात नातवाची गोळी झाडून हत्या; अपघाताचा बनाव करणाऱ्या पाच आरोपींना अटक.

73
0

लोणावळ्यात नातवाची गोळी झाडून हत्या; अपघाताचा बनाव करणाऱ्या पाच आरोपींना अटक .

जुन्या वादातून हत्येचा प्रकार उघड; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातवाची गोळी झाडून हत्या करून मृत्यू अपघाती असल्याचा बनाव करणाऱ्या पाच आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अभय माणिक मराठे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली असून, त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी घटनास्थळी बनावट परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

सुरुवातीला अभय मराठे हे रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना या घटनेबाबत संशय निर्माण झाला. मृताच्या छातीच्या मध्यभागी गोळी लागल्याचे तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले. या परिस्थितीवरून ही घटना अपघाती नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. 

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील रक्ताचे डाग तसेच इतर परिस्थितीजन्य पुराव्यांची तपासणी करण्यात आली. तपासातून अभय मराठे आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात काही दिवसांपासून वाद असल्याचे समोर आले.

५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी झालेल्या वादातून आरोपी मोतीराम राजवी मराठे यांनी रायफलमधून गोळी झाडून त्यांचा नातू अभय माणिक मराठे याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मयताचा चुलता हिरामण मोतीराम मराठे, चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि हिरामण मराठे यांची बहीण राजश्री दशरथ पवार यांनी संगनमत करून हत्या लपविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर आणि कॅमेरे काढून लपविण्यात आल्याचे तपासात समोर आले. तसेच घटनास्थळी वेगळी परिस्थिती निर्माण करून मृत्यू अपघाती असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(२) आणि ३(५) तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम ३, २७(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात मोतीराम राजवी मराठे (वय ६३), हिरामण मोतीराम मराठे (वय ४५), मनोज हिरामण मराठे (वय ३२), कविता हिरामण मराठे (वय ५०) आणि राजश्री दशरथ पवार (वय ५८) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. 

या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि पुणे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांनी केले.

कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत तसेच पोलीस अंमलदार संतोष शिरसाट, गणेश होळकर, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष भापकर, सिद्धेश पाटील आणि अजय डेरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे सुरुवातीला अपघाती वाटणाऱ्या मृत्यूमागील हत्येचा प्रकार उघडकीस आला असून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.