सुपा-बारामतीत दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या; दागिन्यांच्या चोरीसाठी कुऱ्हाडीने वार, २५ वर्षीय आरोपी अटकेत.
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला, आरोपी विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत याची गुन्ह्याची कबुली
बारामती : सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरवाडी, ता. बारामती येथे चोरीच्या उद्देशाने दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणातील विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(२), ३०९(४), ३३२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी गणेश मारुती लडकत (वय ४५) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. फिर्यादी यांच्या आई इंदुमती लडकत (वय ७५ वर्षे) आणि चुलती कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५ वर्षे) या दोघी शेरवाडी येथे राहत होत्या.
अज्ञात चोरट्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर घराच्या समोरील ओट्यावर फिर्यादी यांच्या आई इंदुमती लडकत आणि चुलती कृष्णाबाई लडकत यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. दोन्ही महिलांच्या मानेवर व डोक्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सुमारे ६ लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला तातडीने सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर आणि कर्नाटकातील निपाणी परिसरातही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी २०० हून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली.
स्थानिक भागातील गुन्हेगारांची माहिती घेत असताना तसेच शेरवाडी गावातील नागरिक व फिर्यादीच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. तपासादरम्यान एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. चौकशीत त्याचे नाव विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी विकास लडकत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दोन महिलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपीकडून चोरी केलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा, बारामती शहर, सुपा पोलीस ठाणे आणि दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.