Home Breaking News गावठी पिस्तुल, ७ जिवंत काडतुसे व तलवारीसह सराईत गुन्हेगार अटकेत; सासवड पोलिसांची...

गावठी पिस्तुल, ७ जिवंत काडतुसे व तलवारीसह सराईत गुन्हेगार अटकेत; सासवड पोलिसांची कारवाई ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

33
0

गावठी पिस्तुल, ७ जिवंत काडतुसे व तलवारीसह सराईत गुन्हेगार अटकेत; सासवड पोलिसांची कारवाई ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

सासवड, दि. १ ऑक्टोबर २०२६ : सासवड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझिन, ७ जिवंत काडतुसे आणि तलवार बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. शुभम राजपुरे (रा. मोरया सोसायटी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सासवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांना आरोपीच्या वाहनामध्ये पिस्तुल असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांच्या पथकाने मोरया सोसायटी येथे जाऊन शुभम राजपुरे याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझा (एमएच १२ टीएन ८५३०) या वाहनाची झडती घेतली असता डॅशबोर्डखालील कप्प्यात गावठी पिस्तुल, दोन मॅगझिन, ७ जिवंत राउंड आणि सुमारे ३ फूट लांबीची स्टीलची तलवार आढळून आली.

पोलिसांनी आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल, १ हजार रुपयांची दोन मॅगझिन, ३ हजार ५०० रुपयांचे KF 7.65 मिमीचे ७ जिवंत राउंड, २ हजार रुपयांची तलवार आणि ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा कार असा एकूण ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८७/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपीविरुद्ध यापूर्वीही मारामारी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, शस्त्र अधिनियम तसेच इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, विशाल जाधव, भुजबल, गोकुळ हिप्परकर, तुषार लोंढे, प्रवीण शेंड, चिले, किटके तसेच पोलीस उपनिरीक्षक शिवतरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.