‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न.
मुंबई : २६ सप्टेंबर २०२६
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाला भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. तब्बल २२ ते २३ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न झाले.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा या प्रमुख गणपतींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शनिवारी सकाळपर्यंत मुंबईतील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने विसर्जनाची प्रक्रिया पार पडली. या वेळी समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या जयघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि भावनिक झाले होते.
दरम्यान, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही विसर्जन करण्यात आले. बेलबाग चौकातून दुपारी ४ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावर दगडूशेठ गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडले.

