Home Breaking News पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंध; नव्या मंडळांना मुख्य मार्गावर ‘नो एंट्री’

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंध; नव्या मंडळांना मुख्य मार्गावर ‘नो एंट्री’

31
0

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंध; नव्या मंडळांना मुख्य मार्गावर ‘नो एंट्री’

पुणे : २२ सप्टेंबर २०२६

पुण्याच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा तब्बल ३० ते ३२ तासांचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा मुख्य विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या सहभागावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनाच यंदा विशेष बाब म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. पुढील वर्षापासून मंडळांच्या सहभागाबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई करणाऱ्या नोटिसा पोलिसांनी सुमारे १५० गणेश मंडळांना बजावल्या होत्या. त्यानंतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोरोनानंतर चतुःशृंगी आणि शिवाजीनगर परिसरातील काही गणेश मंडळांना केळकर आणि कुमठेकर रस्त्यांवरून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गांवरील वाढती गर्दी आणि मिरवणुकीचा वाढणारा कालावधी लक्षात घेऊन यंदा नव्या मंडळांना मुख्य मार्गावर सहभागी करून न घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

दरम्यान, गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून केळकर आणि कुमठेकर रस्त्यांवरून सहभागी होता येणार आहे. संबंधित मार्गांवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांकडून अर्ज मागवण्यात आले असून, त्यानुसार परवानगी देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

यंदा महोत्सवी वर्ष असलेल्या गणेश मंडळांना तसेच मध्यवर्ती पेठ भागातील गेल्या वर्षी किंवा यंदा प्रथमच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा देण्यात आला आहे. या मंडळांना यंदा केळकर रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होता येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

मात्र, गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना निर्णय घेतल्याने परवानगी नाकारण्यात आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मंडळांनी आधीच तयारी केली असताना निर्बंध लावण्यात आल्याने गेल्या वर्षीप्रमाणे सर्व मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर केली आहे.