पुणे:सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा शुभारंभ; सुरक्षित मातृत्वासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार.

पुणे | १२सप्टेंबर :
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लवळे, मुळशी येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पसमध्ये करण्यात आला. यावेळी सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीत ‘माहेर’ म्हणजे माया, काळजी आणि ‘तू एकटी नाहीस’ हा विश्वास आहे. याच भावनेतून ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांतर्गत गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलेला वैद्यकीय उपचारांसोबत भावनिक आधार, पोषण, विश्रांती, कुटुंबाचा सहवास आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची संकल्पनाही या उपक्रमात आहे.
सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित व दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘माहेर अनुभव, माहेर पोषण, माहेर संस्कृती आणि माहेर बाळंतपणोत्तर काळजी’ या चार प्रमुख आधारस्तंभांवर उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. संवेदनशील परिचर्या, पसंतीच्या व्यक्तीची साथ, पौष्टिक आहार, सांस्कृतिक परंपरांचा सन्मान, स्तनपान व नवजात बालकाची काळजी तसेच प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन यामधून मातांची सर्वांगीण काळजी घेतली जाणार आहे.
यावेळी आमदार शंकर मांडेकऱ, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मातृत्व व बाल आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या आरोग्यसेवकांचा तसेच ‘माहेरवाशीण’ उपक्रमाच्या लाभार्थी मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

