पुणे पोलिस दलात खळबळ; रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत जाणे ३ पोलिसांना भोवले.
पुणे | १२सप्टेंबर.
पुणे पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. शुभम विजय सुर्वे, योगेश भागचंद्र एकशिंगे आणि अभिजीत अनिल शिंदे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला पुणे पोलिस दलातील हे तीन कर्मचारी उपस्थित होते. गुन्हेगारांशी जवळीक ठेवणे तसेच त्यांच्या खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे पोलिस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून तिन्ही कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली. चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर गुन्हेगारांशी जवळीक, बेजबाबदार वर्तन, कर्तव्यात कसूर आणि पोलिस दलाची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली असून, पोलिस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध आणि त्यांच्या वर्तनाबाबत वरिष्ठ पातळीवर अधिक गांभीर्याने पाहिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


