Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मारामारीपासून कोट्यवधींच्या फसवणुकी पर्यंत १५ गुन्हे दाखल.

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मारामारीपासून कोट्यवधींच्या फसवणुकी पर्यंत १५ गुन्हे दाखल.

38
0

पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मारामारीपासून कोट्यवधींच्या फसवणुकी पर्यंत १५ गुन्हे दाखल.

पुणे, दि. २५ ऑगस्ट २०२६ : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत २४ ऑगस्ट रोजी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून, मारामारी, दुखापत, घरफोडी, चोरी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या नोंदीमध्ये पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलचे नुकसान केल्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिक्रापूर परिसरात पाहुण्यांनी घरासमोर वाहन आणल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर संबंधितांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यवत परिसरात कौटुंबिक वादातून महिलेच्या पतीला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. दौंड आणि सासवड परिसरातही जुन्या वादातून मारामारी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

घरफोडीच्या घटनांमध्ये भिगवण, लांजेवाडी आणि बारामती शहर परिसरातील प्रकरणांचा समावेश आहे. लांजेवाडीतील घरफोडीत १ लाख ११ हजार रुपये, तर बारामती शहरातील घरफोडीत सोन्याचे दागिने, रोकड व इतर वस्तू असा सुमारे ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

राजगड हद्दीत एसटी बसमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले असून, चोरीच्या दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख ९३ हजार रुपये आहे. मंचर परिसरात कारची काच फोडून सोन्याचे दागिने व कागदपत्रे चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे.

शिक्रापूर परिसरात पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलेचा विश्वास संपादन करून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन फसवणूक केल्याचे प्रकरणही दाखल झाले आहे.

राजणगाव गणपती परिसरात मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून रक्कम काढून ३ लाख २९ हजार ५९६ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. मोबाईलसह एकूण ३ लाख ४४ हजार ५९६ रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पवार यांच्याकडे असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

मुळशी तालुक्यातील कंपनीच्या नावाने बनावट इनव्हॉइस तयार करून तब्बल ३ कोटी ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

शिक्रापूर हद्दीत ऊसतोड कामगार उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत १९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.

पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी कार्यालयातील कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्याशी शिवीगाळ व अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याकडून तपास सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. संबंधित प्रकरणात आयटी कायद्यान्वयेही कलमे लावण्यात आली आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या २५ ऑगस्टच्या प्रेस नोटनुसार, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या या गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू असून, आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.