Home Breaking News पुणे ग्रामीणमध्ये गुन्हेगारीचा कहर; चार वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि मारहाणीचे...

पुणे ग्रामीणमध्ये गुन्हेगारीचा कहर; चार वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल.

70
0

पुणे ग्रामीणमध्ये गुन्हेगारीचा कहर; चार वेगवेगळ्या घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल.

पुणे: ०६  ऑगस्ट :पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत अवघ्या दोन दिवसांत घडलेल्या चार गंभीर घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बारामती, रांजणगाव, शिरूर आणि मंचर परिसरात खुनाचा प्रयत्न, अपहरण, जीवघेणी मारहाण आणि धमकावल्याच्या घटनांमध्ये पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. 

बारामती शहरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये एका महिलेने पतीला औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर त्याला मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. जखमीवर उपचार सुरू असून या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रांजणगाव एमआयडीसी परिसरात ट्रेलर चालकाचा रस्ता अडवून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील बाभुळसर येथे किरकोळ कारणावरून तीन अज्ञात व्यक्तींनी एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. तसेच मंचरमध्ये दोन गटांतील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व घटनांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.