Home Breaking News पुण्यात तुळापूरमध्ये खासगी बंगल्यात रेव्ह पार्टीवर कारवाई, मद्य-गांजा जप्त ; 156 जण...

पुण्यात तुळापूरमध्ये खासगी बंगल्यात रेव्ह पार्टीवर कारवाई, मद्य-गांजा जप्त ; 156 जण ताब्यात.

16
0

पुण्यात तुळापूरमध्ये खासगी बंगल्यात रेव्ह पार्टीवर कारवाई, मद्य-गांजा जप्त ; 156 जण ताब्यात.

पुणे : ७ जून शहरात पुन्हा एकदा हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा मोठा भांडाफोड झाला आहे. आळंदी-मार्कल रोडवरील तुळापूर परिसरातील एका आलिशान खासगी बंगल्यात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे छापा टाकत 156 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या बंगल्यात मध्यरात्रीनंतरही पार्टी सुरू होती. त्यानंतर 15 अधिकारी आणि 65 पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी पहाटे साडेदोनच्या सुमारास धाड टाकली. कारवाईदरम्यान 107 पुरुष आणि 49 तरुणींसह एकूण 156 जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील तीन तरुणींचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपासादरम्यान पार्टीसाठी घेतलेला मद्यविक्री परवाना रात्री 11.30 वाजेपर्यंतच वैध असल्याचे समोर आले. मात्र परवान्याची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. त्यामुळे आयोजकांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या रेव्ह पार्टीसाठी सहभागी झालेले युवक-युवती कोणत्या भागांतून आले होते, त्यांचा आयोजकांशी काय संबंध होता आणि पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यातील वाढत्या रेव्ह पार्टी संस्कृतीबरोबरच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.