तुकाराम मुंढे यांची राज्यभर धडक मोहीम; 5 दिवसांत 195 धाडी, 192 आरोपी अटकेत, जवळपास 2 कोटींचा गुटखा जप्त.

मुंबई : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी धडक मोहीम राबवली आहे. 1 ते 5 जून 2026 या पाच दिवसांत राज्यभर 195 धाडी टाकून 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या कारवाईत 192 आरोपींना अटक करण्यात आली असून 123 गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत धाराशिव, धुळे, नांदेड, पुणे आणि समृद्धी महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे 1.02 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर 60.50 लाख रुपयांचा माल आणि वाहन जप्त करण्यात आले.
विभागनिहाय आकडेवारीनुसार कोकण विभागात सर्वाधिक 79 धाडी टाकण्यात आल्या असून 78 जणांना अटक झाली आहे. पुणे विभागात 52 धाडी व 52 अटक, तर बृहन्मुंबईत 30 धाडी व 30 अटक करण्यात आल्या आहेत. भेसळखोर आणि अवैध व्यापार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा FDAने दिला आहे. नागरिकांनी तक्रारींसाठी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी केले आहे.