महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा उत्सव
मुंबई: . दि.३ एप्रिल २०२६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे करावयाच्या विविध सेवा-सुविधांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार असून या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी घेतला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क व प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे हा जयंती सोहळा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारे पर्व ठरते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी, उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नागरिकांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिद्धी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले.
बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
