Home Breaking News ठाणे हादरले! वागळे इस्टेटमधील ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

ठाणे हादरले! वागळे इस्टेटमधील ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

13
0

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या सुमारे ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी संबंधित कुटुंब घरात उपस्थित होते. अचानक स्लॅब कोसळल्याने घरातील सदस्य जखमी झाले आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर तिन्ही जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण इमारत तातडीने रिकामी केली असून इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेमुळे ठाण्यातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा इमारतींची तपासणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.