नवी दिल्ली : भारतीय युवा क्रिकेटने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध करत ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब, झिम्बाब्वे येथे ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयामुळे भारत सर्वाधिक वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकणारा देश ठरला आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना प्रचंड धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि त्याचा फायदा संघाला झाला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 175 धावांची अविश्वसनीय आणि आक्रमक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याला आयुष म्हात्रेच्या 53 धावांची भक्कम साथ लाभली. भारताने 50 षटकांत 9 बाद 411 धावा केल्या.
412 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. शिस्तबद्ध आणि धारदार गोलंदाजीमुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठता आली नाही आणि भारताने सहज विजय मिळवला.
BCCI कडून कोचिंग स्टाफचे विशेष अभिनंदन
या ऐतिहासिक विजयानंतर BCCI ने मुख्य प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचे विशेष कौतुक केले. संघाला योग्य दिशा, शिस्त आणि स्पष्ट रणनीती देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे बोर्डाने अभिनंदन केले.
तसेच BCCI सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख VVS लक्ष्मण यांच्याबाबतही विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे आणि ‘ज्युनियर ते एलिट क्रिकेट’ या अखंड मार्गदर्शन प्रणालीमुळे युवा खेळाडूंना योग्य संधी मिळाल्याचे बोर्डाने नमूद केले. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेटचा भक्कम पाया अधिक मजबूत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
युवा क्रिकेटपटूंना मोठी प्रेरणा
या विजयानंतर देशभरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांतील खेळाडूंनाही आता जागतिक पातळीवर खेळण्याची प्रेरणा मिळाली आहे. या यशामुळे भविष्यातील टीम इंडिया अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
भारताचा हा विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नसून भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाऊल मानला जात आहे.