लखनऊ : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने एक अनोखा आणि व्यापक उपक्रम हाती घेतला असून, तब्बल २.८९ कोटी ‘काटलेले’ किंवा यादीतून वगळले गेलेले मतदार पुन्हा शोधण्यासाठी १० दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या काळात पक्षाचा संपूर्ण यंत्रणा केवळ मतदार यादीतील त्रुटी शोधणे आणि पात्र नागरिकांना पुन्हा मतदार म्हणून नोंदविण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
या मोहिमेत अनुपस्थित, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित म्हणून नोंद झालेल्या (ASD – Absent, Shifted, Dead) मतदारांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. अनेक वेळा प्रत्यक्षात जिवंत असलेले नागरिक मृतांच्या यादीत टाकले जातात, किंवा अजूनही त्या भागात राहणारे लोक ‘अनुपस्थित’ म्हणून नोंदवले जातात. अशा त्रुटींमुळे लाखो नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात.
भाजपने ठरवले आहे की, या मोहिमेत अशा प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना पुन्हा मतदार म्हणून नोंदणी करून दिली जाईल. यासाठी बूथ स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला दररोज किमान पाच नवीन मतदार तयार करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. बूथ कमिटीचे सदस्य घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील, प्रत्यक्ष स्थिती पडताळतील आणि पात्र नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी मदत करतील.
पक्ष नेतृत्वाच्या मते, हा उपक्रम केवळ राजकीय फायद्यासाठी नसून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आहे. “प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. कोणतीही प्रशासकीय चूक किंवा दुर्लक्षामुळे कुणाचाही हक्क हिरावला जाऊ नये,” हा या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागासह शहरी वस्त्यांमधील अनेक दुर्लक्षित नागरिक पुन्हा मुख्य प्रवाहात येणार आहेत. स्थलांतरित कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी, वृद्ध नागरिक आणि नव्याने १८ वर्षे पूर्ण केलेले युवक यांना विशेषतः या मोहिमेचा लाभ होण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा उपक्रम भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवतो. बूथ पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करणे हे कोणत्याही पक्षासाठी मोठे आव्हान आहे. मात्र, भाजपने ते स्वीकारून लोकशाही प्रक्रियेत नवे प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशात सुरू होणारी ही मोहीम देशातील इतर राज्यांसाठीही एक आदर्श ठरू शकते. “हरवलेला मतदार शोधा, लोकशाही मजबूत करा” हा संदेश या महाअभियानातून संपूर्ण देशाला मिळणार आहे.