Pimpri-Chinchwad : सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम केवळ अर्थव्यवस्था किंवा उद्योगांवरच नाही तर सामाजिक कार्यक्रमांवरही होताना दिसत आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी लग्नसराईवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे शहरातील अनेक केटरर्सना लग्नसमारंभांच्या जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. परिणामी, पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या सुमारे १० हजार लग्न सोहळ्यांवर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत लग्नासाठी सुमारे ३० मुहूर्त आहेत. सामान्यतः एका मुहूर्तावर शहरात ४०० ते ५०० लग्न सोहळे पार पडतात. त्यानुसार या दोन महिन्यांत अंदाजे १० ते १२ हजार विवाह सोहळे होण्याची शक्यता होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने केटरिंग व्यवसायाला मोठा फटका बसत आहे.
शहरातील अनेक केटरर्सना मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभांच्या जेवणाच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. परंतु गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी या ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. काही कुटुंबीयांनी आधीच हॉल बुकिंग, सजावट, केटरिंग आणि इतर तयारी पूर्ण केली असतानाच अचानक या परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. याशिवाय काही केटरर्सनी पर्यायी मार्ग म्हणून अधिक दराने गॅस उपलब्ध झाल्यास प्रती थाळी १० ते २० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे लग्नसमारंभाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच महागाईच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभाचे बजेट वाढले असताना या नव्या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक गणिते बिघडू शकतात.
पिंपरी-चिंचवड केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे यांनी सांगितले की, शहरातील सुमारे ४५० केटरर्सकडे हजारो लग्नसमारंभांच्या ऑर्डर आहेत. मात्र गॅसचा तुटवडा कायम राहिला तर अनेक कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलावे लागतील. “केटरिंग व्यवसाय पूर्णपणे गॅस पुरवठ्यावर अवलंबून आहे. गॅस उपलब्ध नसेल तर मोठ्या प्रमाणात जेवण बनवणे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीचा परिणाम केवळ लग्नसमारंभांवरच नव्हे तर केटरिंग उद्योगावरही होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील केटरर्सकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे काम करणाऱ्या सुमारे ४५ हजार कामगारांच्या रोजगारावरही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकी, वेटर्स, साफसफाई कामगार, भांडी धुणारे, ट्रान्सपोर्ट कर्मचारी आणि इतर कामगार या व्यवसायावर अवलंबून आहेत. दरम्यान, केटरर्स संघटनांनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. लग्नसराईच्या हंगामात गॅसचा स्वतंत्र कोटा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात येत आहे. जर लवकरच या समस्येवर तोडगा निघाला नाही तर शहरातील हजारो कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांवर संकट येऊ शकते.
सध्या अनेक कुटुंबीय पर्यायी व्यवस्था शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण लग्नाचे मुहूर्त बदलण्याचा विचार करत आहेत तर काहीजण साध्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र परिस्थिती किती दिवस कायम राहते यावर पुढील निर्णय अवलंबून असणार असल्याचे सांगितले जात आहे.