Home Breaking News पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

28
0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत एकमताने नेतृत्व निश्चित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार अध्यक्ष पदासाठी विरधवल जगदाळे आणि विजयसिंह शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, विजयसिंह शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे विरधवल जगदाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी विवेक वळसे पाटील आणि मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी मंगेश काकडे यांनी माघार घेतल्याने विवेक वळसे पाटील यांची निवड बिनविरोध झाली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ तसेच संबंधित निवडणूक नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याचे स्पष्ट केले. सर्व नामनिर्देशन पत्रांची तपासणी करून ती वैध ठरवण्यात आली आणि त्यानंतर माघारीसाठी निश्चित कालावधी देण्यात आला होता.
या निवडीमुळे जिल्हा परिषद प्रशासनात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या नेतृत्वाकडून ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळेल, पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत, “जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रस्ते विकास या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाईल,” असे सांगितले. तर उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
सभेच्या प्रारंभी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेमध्ये राजकीय एकोपा आणि समन्वयाचे उदाहरण पाहायला मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.