Home Breaking News ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये दोन महत्त्वाचे करार; PET पुनर्वापर व नेट-झिरो रोडमॅपला...

‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये दोन महत्त्वाचे करार; PET पुनर्वापर व नेट-झिरो रोडमॅपला गती

26
0
मुंबई : ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’दरम्यान पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि राज्य हवामान कृती कक्षाच्या वतीने दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मंत्री Pankaja Munde यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राज्य हवामान कृती कक्षाने Climate Trade LLP सोबत हवामान वित्त, कार्बन बाजारपेठ आणि शाश्वत प्रकल्पांना चालना देण्यासाठी करार केला. तर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने Hindustan Coca-Cola Beverages कंपनीसोबत ‘महा-आरईपीटी’ (Maha-REPT) अभियान राबविण्यासाठी सामंजस्य करार केला. पीईटी (PET) बाटल्यांचे संकलन, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापरासाठी राज्य शासनासोबत कोकाकोला कंपनीने देशात पहिल्यांदाच असा करार केल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमातून प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासोबतच परिपत्र अर्थव्यवस्थेला (Circular Economy) चालना मिळणार आहे. शहरी भागांमध्ये संकलन यंत्रणा मजबूत करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे या बाबींवर भर दिला जाणार आहे.
यावेळी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज आणि वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमात विविध उद्योग प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि हवामान तज्ज्ञ उपस्थित होते. ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये राज्य हवामान कृती कक्षाने दोन महत्त्वाचे अहवालही प्रसिद्ध केले. C40 Cities यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘C40 अहवाल : महाराष्ट्रातील शहरांतील ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रातील नेट-झिरो संक्रमण’ या अहवालात राज्यातील शहरांसाठी हवामान-प्रतिरोधक आणि शाश्वत विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडण्यात आला आहे.
मुंबई, अमरावती आणि ठाणे यांसह सात शहरांनी उच्च प्रभावी कृती आराखडे तयार केले असून, महानगरपालिका इमारती नेट-झिरो करणे, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प वाढवणे, ऊर्जा कार्यक्षम इमारत संकल्पना राबविणे आणि हरित पायाभूत सुविधांना चालना देणे यावर भर देण्यात आला आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शासन, उद्योग आणि समाज यांचा समन्वय अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राने हरित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’ हा राज्याच्या हवामान कृतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून, भविष्यात अधिक व्यापक आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचे संकेत या कार्यक्रमातून देण्यात आले.