Home Breaking News दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याची चादर; दृश्यमानता शून्यावर, ‘खराब’ श्रेणीत हवा गुणवत्ता, आनंद विहारमध्ये...

दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याची चादर; दृश्यमानता शून्यावर, ‘खराब’ श्रेणीत हवा गुणवत्ता, आनंद विहारमध्ये AQI 334

3
0
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआर परिसरात मंगळवारी पहाटेपासून दाट धुक्याची चादर पसरली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. घनदाट कोहऱ्यामुळे अनेक भागांमध्ये दृश्यमानता केवळ 100 मीटरवरून थेट शून्य मीटरपर्यंत घसरली. परिणामी रस्ते वाहतूक, रेल्वे आणि हवाई सेवा यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पहाटेच्या वेळी दिल्ली-गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबाद परिसरात दाट धुके असल्याने वाहनांचा वेग मंदावला. काही उड्डाणे उशिरा सुटली तर काही रेल्वे गाड्याही उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आणि वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, धुक्यासोबतच दिल्लीतील वायुप्रदूषणाची समस्या अद्याप कायम आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, सकाळी सात वाजता दिल्लीचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 256 नोंदविण्यात आला, जो ‘खराब’ श्रेणीत मोडतो. तर आनंद विहार परिसरात AQI तब्बल 334 इतका नोंदला गेला असून तो ‘खूप खराब’ (Very Poor) श्रेणीत गणला जातो.
तज्ञांच्या मते, थंड हवामान, कमी वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे प्रदूषक कण हवेतच अडकून राहतात, त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. गेल्या काही दिवसांत वाऱ्याचा वेग किंचित वाढल्याने प्रदूषणात काहीशी घट दिसत असली तरी परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सकाळच्या वेळी व्यायाम टाळावा आणि शक्यतो घरातच राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दिल्ली प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकामांवर निर्बंध, पाण्याची फवारणी, वाहतूक नियंत्रण आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र हवामानातील बदलांमुळे येत्या काही दिवसांतच परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.