पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी गावात झालेल्या जाहीर प्रचार सभेत जोरदार आणि परखड शब्दांत भाष्य केलं. “बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे” असे सांगत, त्यांनी अनेकांना आपण पदे दिली, मात्र काहींनी त्या पदांचं भान ठेवलं नाही, अशी खंत व्यक्त केली. माणुसकी सोडून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या अशा मंडळींना घरी बसवा, असे स्पष्ट आणि ठाम आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. “कधी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेली पिंपरी चिंचवड महापालिका २०१७ नंतर सत्तेत आलेल्यांनी कर्जबाजारी केली. आठ हजार कोटींच्या ठेवी मोडल्या, कर्जरोखे काढले. ४० हजार कोटींची कामं झाली असं सांगितलं जातं, पण ती कामं शहरात कुठेच दिसत नाहीत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणे–मुंबई महामार्गावर रावेत परिसरात होणारी वाहतूक कोंडी, वाहनतळासाठी जागेचा अभाव, नियोजनशून्य विकास याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितलं की, सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे शहरासाठी कोणतंही व्हिजन नाही. “त्यांचं लक्ष फक्त टेंडरमध्ये रिंग करणे, दादागिरी करणे यावर आहे. काही लोकांच्या मालमत्ता अचानक कशा वाढल्या, हे नागरिकांनी तपासून पाहावं,” असा टोलाही त्यांनी लगावला. भ्रष्टाचारावर बोलताना अजित पवार म्हणाले, “कुत्र्यांच्या नसबंदीपासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत सगळीकडे पैसे खाल्ले गेले. लँड माफियांसोबत आता खोदाई माफियाही निर्माण झाले आहेत. प्रारूप विकास आराखड्यावर तब्बल ५० हजार हरकती आल्या आहेत. आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित करणं म्हणजे यांचं नियोजन किती ढिसाळ आहे, हेच दाखवतं,” अशी टीका त्यांनी केली.
यावेळी उमेदवार संदीप वाघेरे यांनीही जोरदार भाषण करत काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली. “कोण संदीप वाघेरे, असं काही लोक विचारतात. पण जनतेने मला निवडून दिल्यानंतर मी अनेक विकासकामं केली आहेत. मी टीमकी नाही, ढोल वाजवतो,” असं म्हणत त्यांनी रंग बदलणाऱ्या राजकारण्यांवर हल्लाबोल केला. पालिकेच्या ठेक्यांवर जगणाऱ्या पिल्लावळींना घरी बसवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
त्याचा संदर्भ घेत अजित पवार म्हणाले, “संदीप वाघेरे यांच्यासारखी स्वखर्चाने काम करणारी माणसं आजकाल दुर्मिळ झाली आहेत. काही लोक सरड्याप्रमाणे रंग बदलतात. आता ते तुमच्याकडे येतील, पाय धरतील, पण अशांना घरी बसवा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी मतदारांना दिला. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, तर शहराच्या भविष्यासाठी आहे. विकास, पारदर्शकता आणि स्वच्छ कारभारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करत अजित पवार यांनी आपले भाषण संपवले.