Home Breaking News दिल्लीचा श्वास गुदमरतोय! प्रदूषण आणि कडाक्याच्या थंडीने राजधानी बेहाल, AQI ‘अत्यंत खराब’...

दिल्लीचा श्वास गुदमरतोय! प्रदूषण आणि कडाक्याच्या थंडीने राजधानी बेहाल, AQI ‘अत्यंत खराब’ ते ‘गंभीर’ स्तरावर

5
0
नवी दिल्ली : दिल्लीकरांना ना प्रदूषित हवेतून दिलासा मिळतोय, ना कडाक्याच्या थंडीपासून. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने शनिवारी राजधानीतील हवेची गुणवत्ता अधिकच खालावली असून, दिल्लीचा एक्यूआय (AQI) ३०० च्या पुढे जात ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवला गेला. काही भागांमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, दोन परिसरांचा AQI ४०० च्या वर पोहोचला आहे, जो ‘गंभीर’ श्रेणीत मोडतो.
रविवारी सकाळीही परिस्थितीत फारसा बदल दिसून आला नाही. अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अजूनही ‘अत्यंत खराब’ श्रेणीत कायम राहिली. धुक्याची दाट चादर, थंड वारे आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच दमा, हृदयविकार आणि श्वसनाच्या त्रासाने ग्रस्त रुग्ण अधिक धोक्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये श्वसनविकाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला अशी लक्षणे अनेकांना जाणवत आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक कण हवेतच अडकून राहतात. वाहनांची वाढती संख्या, बांधकामांची धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि शेजारील राज्यांतील शेती जाळण्याचे परिणाम हे प्रदूषण अधिक तीव्र करत आहेत. हवामानातील बदलांमुळे ही स्थिती काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे, मास्कचा वापर करण्याचे आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राजधानीत प्रदूषणाचा प्रश्न अजूनही गंभीरच असून, दिल्लीकरांना स्वच्छ श्वास कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.