पुणे :- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील संभाव्य एकत्रीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक वक्तव्य केले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे (शरद पवार आणि अजित पवार) उद्या एकत्रीकरण झाले, तर भाजपला त्यांच्यासोबत सरकार चालवावे लागेल का?” असा प्रश्न त्यांच्या मनात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
लोकसत्ता ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. आज ते एकत्र आहेत, पण उद्या देखील ते एकत्र राहतील का? भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध झाली, तर राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला त्यांच्यासोबत सरकार चालवावे लागेल का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत.”
सध्या राज्य पातळीवर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुतीत सत्तेत असतानाही पुणे महापालिका निवडणुकीत मात्र चित्र वेगळे दिसत आहे. भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीच्या चर्चा फसल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र आली असून, राज्य पातळीवरील विरोधी भूमिका आणि स्थानिक पातळीवरील मैत्री यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अलीकडच्या काही दिवसांत अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “महायुतीत आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले होते की सोयीसाठी निवडणुका वेगवेगळ्या लढायच्या, पण एकमेकांवर टीका करायची नाही. एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर टीका केली नाही आणि आम्हीही त्यांच्यावर केली नाही. अजित पवारही हे पाळत होते, मात्र सुमारे आठ दिवसांपूर्वी त्यांनी अचानक टीका सुरू केली. त्यानंतर आम्हालाही बोलावे लागले, अन्यथा लोकांना वाटले असते की आमच्यात काहीतरी बिनसले आहे.”
याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील नेतृत्वावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले. “पूर्वी महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरत होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी अशी नेतृत्वक्षमता दाखवली आहे की राजकारण त्यांच्याभोवती फिरत आहे. त्यांच्याकडे निश्चितच काहीतरी मोठा विचार आणि दूरगामी रणनीती असणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत, तसेच भाजप आणि महायुतीच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी महापालिका आणि विधानसभा राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.