कधी शौर्य, पराक्रम आणि अभिमानाची साक्ष देणारी मावळची भूमी आज मात्र शांतपणे रडते आहे. डोंगरदऱ्यांत घुमणाऱ्या इतिहासाला अभिमानाची किनार असली, तरी अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांनी या मातीवर वेदनेची गडद छाया पसरली आहे. शिरगावसारखी घटना ही केवळ एका कुटुंबावर ओढवलेली आपत्ती नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारी जखम आहे. जेव्हा एखादं निरागस बालहास्य कायमचं हरवतं, तेव्हा समाज म्हणून आपण इतके शांत, इतके गप्प कसे राहू शकतो, हा प्रश्न आज मावळ आपल्याला विचारतो आहे.
अशा घटना अचानक घडल्यासारख्या वाटतात, पण त्यांच्या मुळाशी वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष, संवेदनाहीनता आणि “हे आपल्या घरात घडलं नाही” असा स्वार्थी दिलासा दडलेला असतो. गुन्हा करणारा व्यक्ती एकटी असू शकते, पण त्याला संधी देणारी उदासीनता ही सामूहिक असते. ही जाणीव स्वीकारणं वेदनादायक असलं, तरी बदलासाठी ते आवश्यक पाऊल आहे.
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या जीवनात अनेक घरांमध्ये संवाद हरवत चालला आहे. आई-वडील कामाच्या ताणाखाली थकलेले, वेळेअभावी गप्प; आणि मुलं त्यांच्या न बोललेल्या भीती, शंका आणि प्रश्नांसह एकटी. “कुणी तुला त्रास देतोय का?” हा साधा प्रश्न विचारायलाही अनेकदा वेळ किंवा धैर्य मिळत नाही. ‘चांगला स्पर्श–वाईट स्पर्श’ याविषयी बोलताना आजही संकोच केला जातो. हा संकोचच मुलांच्या सुरक्षिततेचा सर्वात मोठा शत्रू ठरतो, हे आपण विसरतो.
लहान हातात चॉकलेट देऊन, खोट्या प्रेमाचा मुखवटा चढवून विश्वास मिळवणाऱ्या विकृत प्रवृत्तींपासून मुलांना वाचवायचं असेल, तर प्रेमानं, मोकळेपणानं आणि सातत्यानं संवाद साधणं अत्यावश्यक आहे. मुलांना “तू मोकळेपणानं सांगू शकतोस” ही भावना मिळणं हीच खरी सुरक्षा आहे.
मात्र ही जबाबदारी फक्त आई-वडिलांपुरती मर्यादित नाही. एखादं मूल रडताना दिसतं तेव्हा आपलं मन हलतं का? की आपण नजर वळवतो? “आपण मध्ये पडू नये” हा विचारच अनेकदा गुन्ह्याचा मूक साथीदार ठरतो. शेजारी, दुकानदार, शिक्षक, वाटसरू—समाजातील प्रत्येक घटकाने जागं होण्याची हीच वेळ आहे. कधी एक हाक, कधी एक फोन, कधी एक धाडसी उभं राहणं… एवढ्यानंही एखादं आयुष्य वाचू शकतं.
शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या केवळ प्रशासकीय यंत्रणा नाहीत, तर समाजाच्या पालकत्वाची विस्तारित रूपं आहेत. मुलांना सुरक्षिततेचं शिक्षण देणं, त्यांच्या मनातील भीती दूर करणं, पालकांना संवेदनशील करणं आणि सतर्कतेची साखळी निर्माण करणं ही त्यांची जबाबदारी आहे. पोलिस प्रशासनाकडूनही केवळ कारवाई नव्हे, तर विश्वास, तत्परता आणि समाजाशी संवाद अपेक्षित आहे.
कायदे आहेत, शिक्षाही आहेत. पण न्याय उशिरा मिळाला, तर जखमा भरत नाहीत. दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे अशी वेळ पुन्हा कुणावरही येऊ नये, यासाठी समाजाने स्वतःला बदलणं.
आज मावळ आपल्याला थेट प्रश्न विचारतो आहे— “तुम्ही माझ्या मुलांसाठी काय केलंत?” या प्रश्नाचं उत्तर मौनात देता येणार नाही. आता तरी त्या रडणाऱ्या मातीचा आवाज ऐकूया. निरपराध हसऱ्या चेहऱ्यांसाठी, सुरक्षित उद्यासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी… आपण सगळे थोडे अधिक माणूस होऊया.