Home Breaking News मराठी सिनेसृष्टीला धक्का : अभिनेत्री हेमलता पाटकर अटकेत, मुंबईतील बिल्डरकडून १० कोटींच्या...

मराठी सिनेसृष्टीला धक्का : अभिनेत्री हेमलता पाटकर अटकेत, मुंबईतील बिल्डरकडून १० कोटींच्या खंडणीचा आरोप

21
0
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक मराठी चित्रपट आणि नृत्यप्रयोगांमधून ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हेमलता पाटकर हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने (Anti-Extortion Cell) गोरेगाव परिसरात एका नामांकित बिल्डरकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे हेमलता पाटकर (वय ३९) आणि अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय ३३) अशी असून, दोघींनाही न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे मराठी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बिल्डरला सातत्याने धमकीचे फोन आणि संदेश पाठवून मोठ्या रकमेची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची तसेच गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून तपास सुरू केला आणि अखेर दोघींना रंगेहाथ पकडण्यात यश आले.
हेमलता पाटकर या मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून सक्रिय होत्या. त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून, त्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ऐ खे क्या करते’ मधील एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या सुनबाई असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या अटकेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खंडणीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, आर्थिक व्यवहार कुठल्या मार्गाने झाले, याचाही शोध घेतला जात आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या व्यक्तीचा अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप झाल्याने, मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आले आहे.