पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये रूपांतर करणे आहे,” सिडनी जे. हॅरिस यांचे हेच वचन लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) जगते. उच्च शिक्षणाच्या संधींद्वारे मुलींच्या सक्षमीकरणाला पाठिंबा देणाऱ्या या फाउंडेशनने २०२५ या वर्षात भारतातील १,४५० हून अधिक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना गुणयोग्यता आणि गरज – आधारित शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.
शिष्यवृत्ती मिळालेल्या १,१०० हून अधिक मुली अभियांत्रिकी, नर्सिंग, मूलभूत विज्ञान आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदवीचे शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त, सातवीच्या ३५० हून अधिक तरुण मुली एलपीएफच्या वाढत्या कुटुंबात सामील झाल्या आहेत. त्या आमच्या शालेय प्रकल्पाचा भाग आहेत, जो मुलींना १० वर्षे सातवीपासून पदवीपर्यंत मदत करतो.
या वर्षी, एलपीएफ शिक्षणाद्वारे जीवन बदलण्याच्या ३० वर्षांचा अभिमानाने उत्सव साजरा करत असताना, फाउंडेशनने संपूर्ण भारतात ११ प्रादेशिक पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले. या महत्त्वाच्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ३० वा शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळा, ज्याला डॉ. किरण बेदी (भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल) यांनी उपस्थिती लावून शोभा वाढवली. एलपीएफचे चिरस्थायी ध्येय आणि प्रभाव साजरा करण्यासाठी त्या तीन दशकांनंतर परत एकदा प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या.वरिष्ठ मुलींच्या पहिल्या समूहाने एलपीएफसोबतचे त्यांचे अनुभव सांगितले; त्या आता जगभरात नेतृत्व पदांवर कार्यरत आहेत.
या प्रसंगी बोलताना डॉ. बेदी म्हणाल्या, “फाउंडेशनच्या ३० व्या वर्षात प्रमुख पाहुण्या म्हणून परत येताना मला अभिमान वाटत आहे. तीन दशकांपूर्वी जेव्हा मी आले होते, तेव्हा फक्त २० मुली लाभार्थी होत्या, आणि आता एलपीएफ हे जवळपास १९,००० सदस्यांचे कुटुंब आहे, जे मला तुमच्या, लीला कन्यांमध्ये असलेल्या सामर्थ्याची आठवण करून देते.”
या पुरस्कार सोहळ्यांना विविध संस्थांमधील प्रतिष्ठित पाहुण्यांनी, तसेच आता त्यांच्या करिअरमध्ये नेतृत्व पदांवर असलेल्या वरिष्ठ लीला मुलींनी उपस्थिती लावून शोभा वाढवली. त्यांचे प्रेरणादायी शब्द आणि वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासाने लीला मुलींच्या नवीन समूहाला यशाच्या मार्गावर वाटचाल सुरू करताना खूप प्रेरणा मिळाली. पद्मश्री श्रीमती लीला पूनावाला (अध्यक्षा, एलपीएफ), श्री फिरोज पूनावाला (संस्थापक विश्वस्त), माजी विश्वस्त आणि सध्याचे विश्वस्त मंडळ, कॉर्पोरेट भागीदार, देणगीदार, एलपीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक, निवड समिती सदस्य, वरिष्ठ लीला कन्या आणि हितचिंतक यांच्या सन्माननीय उपस्थितीत या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

