पिंपरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) महादेव पवार यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. प्रभाग क्रमांक २५ ड, सर्वसाधारण गट (वाकड-पुनावळे) येथून त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेतन पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून युवक संघटन, सामाजिक प्रश्न, नागरी समस्या आणि जनहिताच्या आंदोलनांमध्ये सक्रिय आहेत. वाकड-पुनावळे परिसरातील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन तसेच युवकांच्या रोजगार व क्रीडा सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. “युवकांचा आवाज नगरपालिकेत पोहोचवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रभागातून भाजपकडून राहूल कलाटे उमेदवार असणार असून त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पवार विरुद्ध कलाटे ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. दोन्ही उमेदवारांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना चेतन पवार म्हणाले, “वाकड-पुनावळे परिसराचा झपाट्याने विकास होत असताना नागरिकांच्या मूलभूत समस्या वाढत आहेत. नियोजनबद्ध विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणे हेच माझे ध्येय आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही चेतन पवार यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करत, युवक नेतृत्वाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून वाकड-पुनावळे प्रभागात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.