Home Breaking News सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांच्या घरी पोलिसांची धडक! बॉम्ब धमकीनं चेन्नईत खळबळ...

सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांच्या घरी पोलिसांची धडक! बॉम्ब धमकीनं चेन्नईत खळबळ उडाली

23
0
चेन्नई | दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांचे जावई असलेले अभिनेता धनुष यांच्या घरांवर सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) चेन्नई पोलिसांनी तातडीची कारवाई केली. कारणही तितकेच धक्कादायक — पोलिसांना आलेल्या एका ईमेलमध्ये या दोन्ही अभिनेत्यांच्या घरांवर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.
हा ईमेल थेट तामिळनाडूच्या पोलिस महासंचालक (DGP) कार्यालयाला पाठवण्यात आला होता. त्यात रजनीकांत आणि धनुष यांच्याबरोबरच काँग्रेस नेते के. सेवालापेरुंथगाई यांच्या घराचाही उल्लेख होता. धमकीचा ईमेल मिळताच पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक (Bomb Squad) तत्काळ घटनास्थळी रवाना केले.
रजनीकांत आणि धनुष यांच्या घराची झडती घेण्यात आली, परिसर सील करण्यात आला आणि सुरक्षा वाढवण्यात आली. सुदैवाने, कोणतेही संशयास्पद साहित्य अथवा बॉम्ब सापडले नाहीत. रजनीकांत यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “घरी कोणतीही अनोळखी व्यक्ती आली नव्हती. धमकी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.”
धनुषचा रजनीकांत यांच्या मुलगी ऐश्वर्या रजनीकांतसोबत 2004 मध्ये विवाह झाला होता, मात्र दोघांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यामुळे धनुष आणि रजनीकांत दोघेही स्वतंत्रपणे राहतात, आणि दोघांच्या घरांना धमकी देणारा ईमेल मिळाल्याने पोलिसही सावध झाले.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हा ईमेल डीजीपी कार्यालयातून ग्रेटर चेन्नई पोलिसांकडे पाठवण्यात आला. त्यात या तिघांच्या घरांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु तपासानंतर ही धमकी खोटी आणि अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
यापूर्वीही चेन्नईत अशा अनेक बनावट बॉम्ब धमक्या समोर आल्या आहेत.
  • २ ऑक्टोबरला अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या घराला धमकी देणारा ईमेल आला होता.
  • ९ ऑक्टोबरला अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक व्यक्ती अटक करण्यात आला.
  • १४ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांच्या स्टुडिओला धमकी ईमेल मिळाला होता.
या सर्व प्रकरणांमध्ये कोणताही बॉम्ब सापडला नाही आणि सर्व धमक्या फेक ईमेल असल्याचे सिद्ध झाले. चेन्नई पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, “या ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर सेल सक्रिय झाला आहे. आरोपी लवकरच गजाआड होईल.