Home Breaking News सर्वोच्च न्यायालयात गोंधळ: सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न — देशभरातून तीव्र...

सर्वोच्च न्यायालयात गोंधळ: सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न — देशभरातून तीव्र संताप आणि निषेध!

16
0
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज (दि. ७ ऑक्टोबर) अभूतपूर्व प्रकार घडला आहे. ७२ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालयातील कार्यवाही काही काळासाठी थांबवावी लागली आणि उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विष्णू मंदिराशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान घडली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गवई यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून (“तुमच्या तक्रारीसाठी भगवान विष्णूकडे जा”) हिंदुत्ववादी संघटनांनी आधीच तीव्र आक्षेप घेतला होता. याच टिप्पणीमुळे राकेश किशोर संतप्त झाले होते आणि त्यांनी भावनांच्या भरात हे अतिरेकी पाऊल उचलले.
घटनेनंतर राकेश किशोर यांना तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “परमात्म्याने जे घडवून आणले ते मी केले. मला कुठलाही पश्चाताप नाही आणि मी माफी मागणार नाही.” या विधानामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, त्यांची वकिली सनद तत्काळ निलंबित करण्यात आली आहे.
या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बारामती आणि कोल्हापूर येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या या कृत्याविरोधात निदर्शनं केली. अमरावतीत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून वकील राकेश किशोरवर कठोर कारवाईची मागणी केली.
कायदेतज्ज्ञांच्या मते, या घटनेने भारतीय न्यायसंस्थेच्या गौरवावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा घटनांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, त्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे, असे मत कायदेपंडितांनी मांडले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची नोंद घेतली असून, न्यायालयीन सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियानेही या कृत्याचा निषेध करत शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली आहे.