पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावरील सत्कार कार्यक्रमांच्या छायाचित्रांचा आणि बातम्यांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. मात्र, या सत्कारांच्या पलीकडे अनेक गंभीर प्रश्न आणि वाद पुन्हा उफाळले आहेत.
शेखर सिंह यांची महापालिका कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त आणि आरोपांनी वेढलेली राहिली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार, ठेक्यांतील अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकल्याचे गंभीर आरोप झाले. त्याचबरोबर, त्यांनी बडतर्फ आयएएस पूजा खेडकर हिला बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या पाठराखणीचा आरोप सहन केला होता. या घटनेनंतर शेखर सिंह यांच्या प्रशासनशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘भव्य सत्कार’ – चर्चेचा विषय! त्यांच्या बदलीनंतर पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेकेदार आणि काही पालिका अधिकाऱ्यांनी केलेला सत्कार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारी अधिकारी आणि ठेकेदारांमधील अशा जवळीकीच्या कार्यक्रमावर नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे. “लोकांच्या पैशातून चालणाऱ्या संस्थेतील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या सत्कारांना उपस्थित राहणे नैतिकतेच्या कक्षेत येते का?” असा सवाल नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
नैतिकतेचा प्रश्न आणि ‘डीओपीटी’ची भूमिका महत्त्वाची! केंद्र सरकारच्या Department of Personnel and Training (DOPT) या आयएएस अधिकाऱ्यांच्या नैतिक आचारसंहितेचे पालन पाहणाऱ्या विभागाने अशा प्रकारच्या सत्काराबाबत चौकशी करावी का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, सरकारी सेवेत असताना किंवा सेवेनंतरही ठेकेदारांकडून सन्मान स्वीकारणे हे हितसंबंधांच्या संघर्षाला जन्म देणारे आणि प्रशासनातील पारदर्शकतेला तडा देणारे कृत्य मानले जाते.
नागरिक आणि समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया! सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “ज्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याचा ठेकेदारांकडून केलेला फाईव्ह स्टार सत्कार म्हणजे नागरिकांच्या भावनांशी केलेला विनोद आहे.” काहींनी या कार्यक्रमाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शेवटी प्रश्न एकच — नैतिकता की ‘नेटवर्क’? या सर्व घटनांमुळे प्रशासनातील नैतिकतेचा स्तर, ठेकेदारांचे प्रभाव, आणि आयएएस अधिकाऱ्यांची जबाबदारी या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे अशा सत्कारांचा ग्लॅमर — यामुळे पिंपरी चिंचवडचा कारभार पुन्हा एकदा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे.