Home Breaking News भारताचा दमदार विजय! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 2-0 ने...

भारताचा दमदार विजय! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 2-0 ने क्लीन स्वीप — दिल्ली टेस्टमध्ये 7 विकेट्सने विजय, गिलची पहिली कसोटी मालिका यशस्वी

25
0
टीम इंडियाने पुन्हा एकदा आपल्या शानदार कामगिरीने क्रिकेटप्रेमींच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने विजय मिळवून 2-0 ने मालिका जिंकली, आणि यासह शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा अभिमानास्पद पराक्रम साधला.
दिल्ली कसोटीत भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. भारतीय संघाने फक्त तीन गडींच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. के.एल. राहुलने चौकार लगावून विजयाची शिक्कामोर्तब केली आणि तो 58 धावांवर नाबाद राहिला. या विजयाने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, संपूर्ण देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात 390 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारताने 518 धावा तर वेस्ट इंडिजने 248 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 270 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने नाबाद 129 धावा केल्या, तर युवा खेळाडू यशस्वी जायसवालने अप्रतिम 175 धावा ठोकत संघाला मजबूत पायाभरणी दिली.
या विजयासह भारताने 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले, 2 हरले आणि 1 सामना बरोबरीत राहिला आहे. सध्या टीम इंडियाकडे 55.56% पॉइंट्स आहेत.
गिलच्या कर्णधारपदाखालील ही मालिका भारतासाठी ऐतिहासिक ठरली आहे, कारण नव्या पिढीचा आत्मविश्वास आणि दमदार खेळ यामुळे भारतीय संघाचे भवितव्य अधिक उज्ज्वल दिसत आहे. या मालिकेनंतर भारत आता 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघाची सलग कामगिरी पाहता असे स्पष्ट होते की, भारत केवळ घरच्या मैदानावरच नव्हे तर जगभरातही कसोटी क्रिकेटचा खरा बादशाह ठरतो आहे.