भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या ‘मोंथा’ या प्रचंड चक्रीवादळाने मंगळवारी भीषण तडाखा दिला. ओडिशा, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील किनारी भागात वाऱ्याचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत नोंदवण्यात आला. मुसळधार पाऊस, समुद्रातील उंच लाटा आणि विजांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर थरारला आहे.
चक्रीवादळामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली असून वीजपुरवठा आणि संचारव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक झाडे आणि वीजेचे खांब उखडून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन दल, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या टीम्स घटनास्थळी रवाना केल्या आहेत.
ओडिशातील गंजाम, पुरी आणि आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे 70,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हवामान खात्याने अजूनही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नुकसानग्रस्त भागांना केंद्र सरकारकडून तातडीची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.