Home Breaking News इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता – विकासाच्या नव्या युगाची...

इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता – विकासाच्या नव्या युगाची सुरुवात

22
0
पिंपरी-चिंचवड | पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या “अमृत योजने” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे इंद्रायणी नदीला नवसंजीवनी मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल ५२५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, नदी सुधारणा, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनावर विशेष भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला गती मिळाली असून, वारकरी संप्रदाय तसेच पिंपरी-चिंचवडकरांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर प्रतिसाद मिळाला आहे.
भाजप आमदार महेश किसनराव लांडगे यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, “इंद्रायणी नदी ही आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक आहे. तिचे पुनरुज्जीवन म्हणजे केवळ पर्यावरणीय सुधारणा नव्हे, तर सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे.”
या प्रकल्पांतर्गत नदीच्या दोन्ही तीरांवर हरित पट्टे, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, आरोग्यदायी विरंगुळ्याची ठिकाणे, तसेच पावसाचे पाणी साठवण आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने नदीचे नैसर्गिक स्वरूप जपले जाईल, तसेच पूर नियंत्रणासाठी नव्या तांत्रिक उपाययोजना राबवल्या जातील.
राज्यातील वारकरी परंपरेसाठी आणि आळंदी-देहू यात्रेकरूंना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. इंद्रायणी नदी पुन्हा एकदा “शुद्ध, सुंदर आणि सजीव” बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
महेश लांडगे म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय आहे. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांचे आभार मानतो.”
 प्रमुख वैशिष्ट्ये :
  • केंद्र पुरस्कृत “अमृत योजना” अंतर्गत प्रकल्प
  • राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता प्राप्त
  • ५२५ कोटींचा खर्च मंजूर
  • नदी स्वच्छता, जैवविविधता संवर्धन आणि सौंदर्यीकरण
  • वारकरी संप्रदाय व स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा