मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ अंतर्गत ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव’चा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सागरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कॉन्क्लेवमध्ये भारतातील सागरी व्यापार, बंदर विकास, जहाज बांधणी आणि हरित ऊर्जा यासंबंधी महत्त्वाच्या चर्चांना सुरुवात झाली. प्रधानमंत्री मोदी यांनी या वेळी ‘ब्लू इकॉनॉमी’च्या माध्यमातून भारताला जागतिक सागरी महासत्ता बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील असे सांगितले. त्यांनी सागरी सुरक्षेला बळकटी देण्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किनारी राज्यांच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळवून देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किनारपट्टी विकास प्रकल्प आणि मुंबई बंदराच्या आधुनिकीकरणावर भर देत राज्य सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सागरी क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीचा केंद्रबिंदू बनेल.
या कॉन्क्लेवमध्ये ‘सस्टेनेबल मेरीटाईम फ्यूचर’ या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी विचार मांडले. सागरी वाहतूक, तटीय पर्यटन आणि नवीकरणीय ऊर्जा यांवर आधारित अनेक नव्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.