Home Breaking News रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई : 28 किलो गांजा जप्त, दोन आरोपी...

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई : 28 किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत, एक फरार

125
0
रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत 28 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारभावानुसार किंमत तब्बल ७ लाख रुपये इतकी असून या प्रकरणी एका महिलेेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
ही कारवाई 26 सप्टेंबर 2025 रोजी मौजे बाभुळसर खुर्द येथील सृष्टी सोसायटीतील रो हाऊस कॉलनीमध्ये करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापा टाकण्यात आला. छाप्यात सौ. दिव्या अतुल गिरे (वय 27, रा. बाभुळसर खुर्द, पुणे) आणि सुरज दिलीप शिंदे (वय 28, रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, हा गांजा आरोपी दिव्या गिरे हिचा पती अतुल वसंत गिरे (रा. बाभुळसर खुर्द) याने विक्रीसाठी आणून दिला होता. मात्र तो पती सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. आरोपींना शिरुर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 29 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि कामगार वसाहतींमध्ये सातत्याने जनजागृती मोहीमा राबविण्यात येत आहेत. पोलीस अधिकारी नियमित कार्यशाळांद्वारे तरुणांना नशेमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत आहेत. या कारवाईमुळे पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, तसेच अनेक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहेत.
ही कारवाई केवळ एक मोठी जप्तीच नव्हे, तर समाजाला एक ठोस संदेश देणारी आहे की, अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना कुठलाही पळवाटा मिळणार नाही.