Home Breaking News ग्रामविकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा- ग्रामविकास व पंचायत...

ग्रामविकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

36
0
पुणे : ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे उपमहासंचालक तथा यशदाअंतर्गत राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक लक्ष्मीकांत शिंदे, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची येत्या 17 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाकडे मोठी यंत्रणा असून विभागाने ठरविल्यास हे अभियान घराघरात पोहोचेल. सरपंच, अधिकाऱ्यांनी हे अभियान आपले आहे या भूमिकेतून काम करावे लागेल. महिला बचत गट, तरुण मंडळे, नेहरू युवा मंडळे, माजी विद्यार्थी संघटना, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गणेश मंडळे, वृक्षप्रेमी संघटना आदी सर्वांना या अभियानाच्या प्रारंभी निमंत्रित करुन त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
समृद्ध गाव बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री यांचा असून त्यासाठी हे अभियान तयार करण्यात आले आहे. हे अभियान आगामी 100 दिवसात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात 20 गावे निवडण्यात येणार आहे. सात ते साडेसात हजार गावे या अभियानात सहभागी होणार असून यातील 1 हजार 920 गावांना काही ना काही बक्षीस देण्यात येईल. चांगले काम करणारी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना बक्षीस देण्यात येणार आहे. समृद्ध महाराष्ट्रासाठी सक्षम पंचायत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
अभियानात ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी यासाठी या अभियानात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 100 टक्के घरकुलांचा लाभ देणारे गाव, 100 टक्के आयुष्मान भारत कार्ड देणारे गाव, स्मशानभूमी आदी कामे करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पोपटराव पवार यांनी राज्यात ग्रामविकासांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षात झालेले बदल, राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, एका गावातील सरपंच, ग्रामसेवकाने ठरवले तर विकास सेवेची मोठी यंत्रणा त्यांच्यामागे उभी राहून गावात मोठे काम करण्याची संधी मिळते. लोकसहभागातून, श्रमदानातून गावात चांगले काम उभे राहू शकते हे हिवरे बाजार गावाने दाखवून दिले आहे. हिवरे बाजारची सुधारणा पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून शिष्टमंडळे भेट द्यायला येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अभियान सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचे प्रशिक्षण देणे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे सांगून प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, पन्नास टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असताना ‘2047 विकसित महाराष्ट्र’ साठी गावातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी ग्रामीण उपजिवीकेची साधने शाश्वत असली पाहिजेत. त्यासाठी गाव पातळीवरील संस्था अधिक विकसित, बळकट करणे आणि त्यातून गावपातळीवरील विकास करणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सादरीकरणात सांगितले.
यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी अभियानाची उद्दिष्ट्ये, अभियानाचे निकष व अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्या गोंदिया जिल्ह्यातील डव्वा (ता. सडक अर्जुनी) गावच्या सरपंच श्रीमती योगेश्वरी चौधरी यांनी आपल्या गावात केलेल्या सुधारणा, बदलांबाबतचे अनुभव सांगितले. कार्यक्रमात श्रीमती योगेश्वरी चौधरी यांच्यासह पंचायत विकास निर्देशांकामध्ये राज्यातील प्रथम 10 जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व राज्यस्तरावरील टीमचा गौरव करण्यात आला.
कार्यशाळेला राज्यभरातून जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. हे सर्व अधिकारी, पदाधिकारी या अभियानासाठी आपापल्या जिल्ह्यात प्रवीण प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत.

जिल्ह्यातील वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे : जिल्ह्यातून 27 ते 29 ऑगस्ट दरम्याण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळेफाटामार्गे ओतूर ते बनकर फाटामार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार असून दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरुन नारायणगाव मार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यसस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 27 ते 29 ऑगस्ट 2025 दरम्याण मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार व गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार नगर कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे जातील. नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.
नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र.50 व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन-नागापूर-रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे.
नारायणगावकडून येताना बायपास क्र.60 मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे. खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील. जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र.48 वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.
मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील. जुना मुंबई ते पुणे मार्गावरुन पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झीटवरुन लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील. लोणावळा शहर परिसरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरुन न जाता वलवण पुलावरुन द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे जातील. या आदेशाची अंमलबजावणी 27 ऑगस्टच्या रात्री 10 वाजल्यापासून 29 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत लागू राहील.
बनावट सही व शिक्क्याच्या पत्रापासून नागरिकांनी सतर्क रहावे
पुणे : पांढरेवाडी व जिरेगाव ता. दौंड जि. पुणे ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, फेज-2 झोन मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव भूसंपादन अधिकारी क्र.03 पुणे यांच्या कार्यालयाकडून भूसंपादन अधिकारी क्र.03 यांची बनावट सही व कार्यालयाचा शिक्क्याचा वापर करुन कार्यालयाचा जा.क्र.उपजि/भूसं3/कावि/421/2025, दि. 20 जुलै 2025 रोजीचे निवेदन अशा आशयाचे पत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, मरोळ इंडल क्षेत्र, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093 यांना पाठविल्याचे पत्र सामाज माध्यमावरुन प्रसारीत होत आहे.
भूसंपादन अधिकारी क्र.03 पुणे यांच्या सही व शिक्क्याचे बनावट पत्र तयार करुन नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. बनावट पत्राबाबत अज्ञाताविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेप, सही व शिक्क्याचा गैरवापर करुन नागरिकांमध्ये दिशाभूल करणारे वातावरण तयार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करुन कायदेशी कारवाई करणेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
तथाकथित निवेदन भूसंपादन क्र.03 कडून देण्यात आले नसून, ते पूर्णपणे खोडसाळ व बनावट असून, नागरीकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या पत्रापासून सतर्क रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.03 पुणेच्या डॉ. संगीता राजापूरकर-चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन
पुणे : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम 2025-26 मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे.
आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
आधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई यांचे कडून पुणे जिल्ह्यास आधार संच प्राप्त  झाले असून जाहिरातीत नमूद ठिकाणाकारीता आधार संच वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आधार संच जिल्ह्यातील पुढे नमुद ग्रामीण महसूल मंडळ व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वितरण करणेकामी पात्र “आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी” जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती डाऊनलोड करून घ्यावी.
इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तसेच 1 सप्टेंबर 2025 रोजीची सुट्टी वगळून)
जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी योजना शाखा, ‘अ’ विंग, 4 था मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावे, असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
गोदाम बांधकाम उभारणी व तेलबिया प्रक्रिया यूनिट घटकासाठी अर्ज करावेत
पुणे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत  जिल्ह्यात गोदाम बांधकाम घटकासाठी अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्याकरीता 250 मे. टन गोदाम बांधकामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत 1 गोदाम व 1 तेलबिया प्रक्रिया युनिटचे उद्दीष्ट प्राप्त आहे. याकरीता शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकडून गोदाम बांधकाम उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रत्यक्ष झालेल्या गोदाम बांधकामाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रूपये जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. काढणी पश्चात पायाभूत सुविधांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल  9 लाख 90 हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
काढणी पश्चात पायाभूत सुविधा अंतर्गत तेलबिया प्रक्रीया युनिट निवडलेल्या लाभार्थ्याने स्वखर्चाने प्रकल्प तयार केला असल्यास प्रकल्पाचे मुल्यांकन, मूल्यमापन व उभारणी नंतर मुल्यांकन करून किंवा निवडलेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार याबाबीच्या लाभास पात्र राहील.
इच्छुक शेतकरी संघ व कंपनी यांनी या योजनेत सहभागी होण्याकरीता 30 ऑगस्ट 2025 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
तात्पुरती वीज संच उभारणीसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना नागरिकांनी खालील प्रमाणे खबरदारी घेण्याबाबत अधिक्षक अभियंता, पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ  हे.ना.गांगुर्डे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.
शक्यतो तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करण्यात येऊ नये. वीज संघ मांडणीस कमीत कमी जोड असावेत, वीज संच मांडणीची उभारणी अधिकृत विद्युत ठेकेदार यांचेकडूनच करण्यात यावी,  लोखंडी साहित्य वापरुन स्टेज उभारणी केल्यास धातूच्या भागास सक्षम भुसंबंधन/आर्थिगशी जोडण्यात यावे.
वीज संच मांडणीस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अथवा तत्सम उपकरणाची (स्वीचगिअर) ची जोडणी करण्यात यावी, गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शोभायात्रा गाडयांची उंची नियमानुसार राखावी जेणेकरुन उघडया वीज वाहिनीच्या संपर्कात येणार नाही. वीज संच मांडणीवर क्षमतेपेक्षा जास्त भार (लोड) जोडण्यात येऊ नये. संचमांडणी सहजासहजी लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन श्री. गांगुर्डे यांनी केले आहे.