हैदराबाद – राजधानी हैदराबादमध्ये अवघ्या ३० मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरात अक्षरशः हाहाकार उडवला आहे. विशेषतः शहरातील एका प्रमुख उड्डाणपुलावर तलावासारखे पाणी साचले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक वाहनचालक पुलावर अडकून पडले आहेत. काही ठिकाणी पाणी इतके साचले की वाहनं पाण्यात बुडाल्याची दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने केवळ वाहतूकच नव्हे तर, आजूबाजूच्या परिसरातील दुकाने, घरं आणि कार्यालयांतही पाणी शिरले आहे.
अशा प्रकारे अर्ध्या तासाच्या पावसातच जर परिस्थिती इतकी गंभीर होत असेल, तर प्रशासनाच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू शकते.
महानगरपालिकेने यावर स्पष्टीकरण देत ही एक अपवादात्मक घटना असल्याचे सांगितले असले तरी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून शहरातील पायाभूत विकासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे.
पावसाने हैदराबादला झोडपलं! अवघ्या अर्ध्या तासात उड्डाणपूल जलमय, वाहतूक ठप्प!