पिंपरी चिंचवड, दि. ८ ऑगस्ट २०२५ – रावेत येथील रेल्वे महामार्ग लगत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेला ‘इको जॉगिंग ट्रॅक’ सध्या अत्यंत दुरावस्थेत असून, यामुळे दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी स्वच्छता, मशागत, वृक्षसंवर्धन आणि सुरक्षेच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी महापालिका उद्यान विभागाला निवेदन दिले आहे.
राजेंद्र तरस यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ट्रॅक लगत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयासोबतच हा जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून येथे दुर्लक्ष झाल्याने परिसरात झाडांच्या निगा राखल्या जात नाहीत, नव्याने लावलेल्या वृक्षांभोवती मोठ्या प्रमाणात जंगली गवत वाढले आहे आणि त्यामुळे वृक्षांची वाढ खुंटली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा ट्रॅक सध्या ‘जॉगिंग ट्रॅक’पेक्षा ‘जंगली ट्रॅक’ बनला आहे.
तरस यांनी सांगितले की, “महापालिकेने वेळोवेळी या ट्रॅकची मशागत करणे गरजेचे असताना तसे होत नसल्यामुळे संपूर्ण परिसराची शोभा मलिन झाली आहे. ट्रॅक वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवून झाडांची निगा राखावी आणि परिसरातील जंगली गवत काढावे.”
यासोबतच, या परिसरात पूर्णवेळ सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सध्या येथे कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने अनेकदा संशयास्पद हालचाली आणि गैरप्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तरस यांनी इशारा दिला की, “याठिकाणी कोणतेही गैरकृत्य झाल्यास त्याची जबाबदारी महापालिका उद्यान विभागाची असेल.”
स्थानिक रहिवाशांनी या मागणीचे स्वागत केले असून, लवकरात लवकर महापालिकेने यावर कार्यवाही करून ट्रॅक पूर्ववत सुस्थितीत आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या ट्रॅकमुळे केवळ व्यायामच नव्हे, तर परिसराचा हरितपणा आणि सौंदर्य जपण्यासही मदत होईल, परंतु त्यासाठी सातत्यपूर्ण देखभाल गरजेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.