Home Breaking News राजगड पोलिसांची मोठी कामगिरी! फक्त १२ तासांत खून प्रकरण उघड – प्रेमप्रकरणातून...

राजगड पोलिसांची मोठी कामगिरी! फक्त १२ तासांत खून प्रकरण उघड – प्रेमप्रकरणातून रचला कट, तिघे अटकेत

83
0

पुणे : भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळच्या डोंगरात सापडलेल्या मृतदेहाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सकाळी व्यायामासाठी गेलेल्या पादचाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृत इसमाची ओळख पटवणेही कठीण झाले होते, मात्र पोलिसांच्या चतुराईने आणि तांत्रिक तपासामुळे केवळ १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.

मृत युवकाची ओळख व पार्श्वभूमी
मृताचे नाव सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ रा. सोलापूर) असे उघड झाले. १८ ऑगस्ट रोजी त्याच्या कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली होती. त्याच्या खुनामागे धक्कादायक कारण समोर आले आहे – एका अल्पवयीन मुलीसोबतच्या संबंधांमुळे झालेला वाद.

गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध
डी.बी. पथकातील पोलीस शिपाई नलावडे यांना मिळालेल्या गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा लावण्यात आला. आरोपी चार युवक गोगलवाडीच्या चर्तुमुख मंदिराजवळ जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.

अटक आरोपींची नावे
१) श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, वडगाव मावळ)
२) संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, वडगाव मावळ)
३) नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे ५ महिने, रा. गोकुळनगर कात्रज, मूळ रा. लातूर)
याशिवाय तिघे विधीसंर्घषित बालक (किशोरवयीन) या प्रकरणात सामील असल्याचे उघड झाले असून, त्यांची चौकशी पालकांच्या उपस्थितीत सुरू आहे.

खुनाचे धक्कादायक कारण
मृत सौरभ हा त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला ‘बहिण’ मानून रोज शाळेत सोडणे–आणणे करायचा. मात्र ही मुलगी आणि विधीसंर्घषित बालक (अ) यांच्यात प्रेमसंबंध होते. ही गोष्ट सौरभने मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर बालक (अ) याला घर बदलावे लागले आणि त्याच्या नात्यात दुरावा आला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी मित्रांना सोबत घेऊन सौरभला डोंगरात नेऊन धारदार शस्त्रांनी निर्दयीपणे हत्या केली.

पोलिसांची कारवाई
पोलिसांनी आरोपींकडून अॅक्टीव्हा स्कूटर, मोटारसायकल, तीन मोबाईल जप्त केले असून खुनासाठी वापरलेली हत्यारेही हस्तगत केली आहेत. तपासादरम्यान गुन्ह्यात आर्म्स अॅक्टसह वाढीव कलमे जोडली गेली आहेत. अटक आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

वरिष्ठांचा सतत आढावा
या संपूर्ण तपासात पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही झाली. तपास अधिकारी पो.स.ई. अजित पाटील पुढील चौकशी करत आहेत.

“प्रेमसंबंधातील अडकावामुळे खून! राजगड पोलिसांची विजयी कामगिरी – १२ तासांत आरोपी जाळ्यात”