Home Breaking News माधुरी हत्ती परत येणार! मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांना मोठा शब्द, सरकारकडून हालचालींना वेग

माधुरी हत्ती परत येणार! मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांना मोठा शब्द, सरकारकडून हालचालींना वेग

13
0
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील ‘महादेवी उर्फ माधुरी’ हत्तीच्या परताव्याबाबत कोल्हापूरकरांचे मनोबल उंचावणारी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारने माधुरी हत्तीच्या परतीसाठी कायदेशीर अडथळे दूर करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “माधुरी हत्ती नांदणीला परत यावी, हीच आमची भूमिका आहे. तिच्या देखभालीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक तयार केले जाईल. नांदणी मठ आणि स्थानिक नागरिकांच्या सोबत सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील,” असे ठामपणे सांगितले.
सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माधुरीची रवानगी गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती केंद्रात करण्यात आली आहे. मात्र, तिच्या परताव्यासाठी कोल्हापूरकरांनी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सामाजिक स्तरावर एकजूट दाखवत तीव्र लढा सुरू केला आहे.
रविवारी नांदणीहून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेने आपला आवाज बुलंद केला. त्यामुळेच राज्य सरकारने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने मार्ग शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ‘माधुरी’ सध्या वनतारामध्ये असून, वनतारा प्रशासनाने ती कायदेशीररीत्या ताब्यात घेतली आहे. मात्र, कोल्हापूरकरांचे हत्तीसोबतचे जिव्हाळ्याचे नाते आणि तिच्या आरोग्याची काळजी पाहता, ती पुन्हा नांदणीला परत यावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोल्हापूरच्या संस्कृतीचा भाग असलेली माधुरी हत्ती पुन्हा आपल्या भूमीत परत येणार, हीच आता जनतेची अपेक्षा!