पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील वादाला सामोपचाराची वाट सापडली आहे. पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांनी एकत्रितपणे निर्णय घेत, विसर्जन मिरवणुकीतील सहभागाबाबत निर्माण झालेल्या मतभेदांवर समन्वयाने तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला. पुणे पोलिस आयुक्तालयात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
या बैठकीस पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मानाच्या गणेश मंडळांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यांनी आपले मत मांडले.
श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित व विकास पवार, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सुनील रासने व महेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पोलिस प्रशासन आणि मंडळांमध्ये सकारात्मक संवाद झाल्यामुळे नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घेता येणार आहे. मिरवणुकीतील वेळापत्रक, मार्ग, पोलिस बंदोबस्त आणि अनुशासन याबाबत सर्व मंडळांचे सहकार्य मिळावे यासाठी लवकरच आणखी एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या वेळा आणि प्राधान्यक्रमावरून काहीशा वादाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र यंदा हे सर्व मतभेद बाजूला ठेवून, “सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्याने विसर्जन मिरवणूक यशस्वी करू,” असा निर्धार मंडळांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव हा सामाजिक एकतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा प्रतीक असतो. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत शिस्त, सुरक्षितता आणि सहकार्य याला महत्त्व दिले जाणार आहे.