चाकण | गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरातील वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिक, उद्योजक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या गंभीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) पहाटेच थेट रस्त्यावर उतरून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
विशेष म्हणजे, रात्री उशिरा बीड जिल्हा दौरा पूर्ण करून, मध्यरात्री एक वाजता पुण्यात दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी विश्रांती न घेता पहाटे सहा वाजता भोसरीतून पाहणीला सुरुवात केली. प्रथम भारतमाता चौकातील वाहतूक व्यवस्था तपासली आणि त्यानंतर थेट चाकणच्या तळेगाव चौकात जाऊन वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष स्थिती पाहिली. या वेळी त्यांनी उपस्थित संबंधित विभागीय अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि पुणे-नाशिक महामार्ग या सर्वच मार्गांवर अवजड वाहनांची वाढती संख्या ही वाहतूक कोंडीचे मुख्य कारण असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी निदर्शनास आणून दिले. दररोज एक लाखाहून अधिक अवजड वाहने या परिसरातून ये-जा करत असल्याने स्थानिकांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण पडत आहे. औद्योगिक वसाहतीतील उत्पादन व मालवाहतूक साखळीवर याचा थेट परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती व स्थानिक नागरिकांनी गेल्या काही आठवड्यांपासून रस्त्यावर उतरून या समस्येविरोधात आंदोलन छेडले होते. त्यांच्या मागणीनुसार, पर्यायी मार्गांचे नियोजन, सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र लेन आणि आवश्यक तेथे फ्लायओव्हर बांधकाम या उपाययोजना तातडीने राबविण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला – “जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. निर्णय घ्या, काम सुरू करा आणि ठोस बदल घडवा.” त्यांच्या या भूमिकेचे उपस्थित नागरिक आणि काही उद्योग प्रतिनिधींनी स्वागत केले.