Home Breaking News गणेशोत्सव २०२५ : पुणे ग्रामीण पोलीस सज्ज! – १२८ गणेश मंडळांसोबत आढावा...

गणेशोत्सव २०२५ : पुणे ग्रामीण पोलीस सज्ज! – १२८ गणेश मंडळांसोबत आढावा बैठक, कडक सुचना व सामाजिक संदेशावर भर

112
0
पुणे : गणेशोत्सव जवळ येताच पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने मोठी तयारी सुरू केली आहे. सण शांततेत आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील १८ पोलीस स्टेशन हद्दीतील १२८ गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील आणि विविध विभागांचे प्रतिनिधी यांची भव्य आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक १४ ऑगस्ट रोजी पुणे ग्रामीण मुख्यालय, चव्हाणनगर येथील भिमाशंकर हॉलमध्ये पार पडली.
बैठकीत उपस्थित विभाग
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनी, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, बीएसएनएल आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारीही सहभागी झाले.
गणेश मंडळांना दिलेल्या महत्त्वाच्या सुचना
प्रत्येक मंडळात किमान ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
मंडळ परिसरात कचरा न पसरवता स्वच्छता राखावी
स्वयंसेवक नेमून रात्रीच्या वेळी दोन सदस्य उपस्थित ठेवणे बंधनकारक
कर्णकर्कश ध्वनीक्षेपक, लेझर लाईट शो वापरण्यास बंदी
वर्गणी/देणगीसाठी जबरदस्ती करणे टाळावे
सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, अंमली पदार्थविरोधी जनजागृती, बालविवाहविरोधी मोहिमा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे
महिला छेडछाड, उपद्रव, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे प्रकार होऊ नयेत याची दक्षता घ्यावी
विसर्जन मिरवणुकीदरम्यान लहान मुलांना नदीपात्राजवळ जाण्याची परवानगी देऊ नये, निर्माल्य पाण्यात टाकू नये
अडचणींचे निवारण आणि विश्वासार्हतेची ग्वाही
अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी मंडळाध्यक्षांकडून थेट अडचणी विचारल्या तर अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी काही समस्या त्याच ठिकाणी निकाली काढल्या. तसेच, भविष्यात कुठलीही अडचण उद्भवल्यास पोलीस दलाशी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.
देशभक्तीचे दर्शन आणि शिस्तबद्ध विसर्जनावर भर
पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना यावर्षी देशभक्तीपर देखावे सादर करण्याचे सुचवले. मिरवणुकीदरम्यान शिस्त राखणे आणि विसर्जन घाटावर योग्य नियोजन करणे यावर भर देण्यात आला. शासनाच्या आदेशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.
“गणेशोत्सव २०२५ : पुणे ग्रामीण पोलिसांची सज्जता – १२८ मंडळांसोबत आढावा बैठक, सीसीटीव्हीपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वे”