Home Breaking News एकपात्री प्रयोगातून अण्णाभाऊ साठेंना भावपूर्ण मानवंदना; थेरगावात त्यांच्या जीवनप्रवासाचे जिवंत सादरीकरण

एकपात्री प्रयोगातून अण्णाभाऊ साठेंना भावपूर्ण मानवंदना; थेरगावात त्यांच्या जीवनप्रवासाचे जिवंत सादरीकरण

13
0
पिंपरी-चिंचवड, थेरगाव: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या औचित्याने पी. एम. श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे एक आगळावेगळा, प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अण्णा भाऊंच्या जीवनप्रवासावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सादर करत प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ सीताराम मोरे यांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमात मोरे यांनी अण्णा भाऊंच्या बालपणातील संघर्ष, लेखनप्रवास, शोषितांच्या आवाजासाठी चाललेला लढा, आणि मुक्ती संग्रामातील योगदान यांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. नाट्यप्रयोगाच्या प्रत्येक क्षणात अण्णाभाऊंचा झळाळता इतिहास उलगडत गेला आणि श्रोत्यांना विचारप्रवृत्त करणारा ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नढे, तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मिडिया परिषद, व मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साकारण्यात आला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेश मोकाशी, अनिल वडघुले, विनय सोनवणे, श्रावणी कामत, सागर सूर्यवंशी, महावीर जाधव, रामकुमार शेडगे, माऊली भोसले, रमेश साठे यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित राहून अण्णा भाऊंना आदरांजली अर्पण केली.
पी. एम. श्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका हर्षदा राऊत, तसेच शिक्षकवर्गातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सोनवणे, तर आभार प्रदर्शन रामकुमार शेडगे यांनी केले.
 सांस्कृतिक जागृतीचा ठसा
अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांच्या जीवनप्रवासाचा एकपात्री प्रयोग हे विद्यार्थ्यांसाठी व उपस्थितांसाठी प्रेरणेचे स्रोत ठरले. अशा कार्यक्रमांतून नव्या पिढीला समाजातील अन्याय, विषमता व शोषणाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.